गोंदिया जिल्ह्यातील महाशिवरात्री यात्रा रद्द
गोंदिया: जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात असले तरी भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने प्रतापगड तसेच गोंदिया जिल्ह्यातील इतर धार्मिक व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी आगामी महाशिवरात्री निमित्त भरणार्या यात्रा व ख्वाजा उस्मान गनी हारुनी उर्स कोरोना विषाणुच्या प्रदुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने व खबरदारी म्हणून जिल्ह्यात आयोजित सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी आज 25 फेब्रुवारी रोजी निर्गमित केले.
महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यातील धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ या ठिकाणी तसेच प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे सलग 5 दिवस महाशिवरात्री व ख्वाजा उस्मान गनी हारुनी उर्स निमित्य यात्रा भरते. यात्रेमध्ये जिल्ह्यासह अन्य राज्यातुन दररोज हजारोच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दीचे स्वरुप निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यास्थितीत जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. रुग्णांची संख्या कमी असली तरी प्रतापगड तसेच जिल्ह्यातील इतर धार्मिक व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी मंगळवार 1 मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त यात्रा भरल्यास कोरोना विषाणुच्या प्रदुर्भाव होऊन कोविड रोगाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात सदर यात्रेचे आयोजन केल्यास कोरोना विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्व सामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरु सकते. त्याअनुषंगाने सदरची यात्रा भरविणे यांग्य नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या अनुषंगाने आज शुक्रवारी जिल्हाधिकारी यांनी महाशिवरात्री निमित्य आयोजित सर्व यात्रा व ख्वाजा उस्मान गनी हारुनी उर्स रद्द करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले. आदेशाचे पालन न करणारी अथवा उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तसेच भरतीय दंड संहितेनुसार अपराध केला असे गृहित धरून कारवाई करण्यात येईल. असे पत्रकात नमूद केले आहे.