Gondia: जिल्ह्यात कोव्हिड सेंटर 9 अन् दाखल रुग्ण 3

गोंदिया: कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महिनाभरापूर्वी कोट्यवधी निधीची तरतूद आरोग्य यंत्रणा सज्ज केली होती. परंतु, गृहविलगीकरणातच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त राहिले आहे. गोंदिया शहरात 8 व तिरोडा येथे एक असे 9 कोविड केअर केंद्र कार्यान्वित आहेत. येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना केअर सेंटर येथे 3 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या कमी असल्याने प्रशासनाची कोट्यवधी रुपयांची बचत होऊन नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहिले आहे.

जिल्ह्यात एप्रिल 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत जिल्ह्यात बाधितांची संख्या 40 हजार झाल्याने जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या अपुरी पडू लागली होती. या दरम्यान शासनाने जम्बो कोव्हिड सेंटर व जिल्ह्यात 25 कोव्हिड सेंटर Covid Center  तालुकानिहाय सुरू केली होती. ही यंत्रणा उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये निधी लागला होता. फेब्रुवारी 2021 पासून दुसरी लाट आली. त्यावेळी जिल्हाभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरू लागला. या दरम्यान 575 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या काळात बाधितांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांव्यतिरिक्त कोव्हिड सेंटरही उपयुक्त ठरू लागल्याने सेंटर ही काळाची गरज असल्याचे दिसून आले.

दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट डिसेंबर 2021 पासून सुरू झाली. हळूहळू बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली होती. जानेवारी 2022 मध्ये बाधित रुग्णांचा संक्रमण दर 28 टक्क्यांच्या जवळपास पोचला होता. त्यामुळे तिसर्‍या लाटेच्या शक्यतेमुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले. प्रत्येक तालुक्यात सेंटर सुरू करण्यात आले होते. मात्र गेल्या महिनाभरापासून बाधित रुग्णांची संख्या पुन्हा घटण्यास सुरुवात झाली आहे. बहुतांशी रुग्ण गृहविलगीकरणातच उपचार घेऊन बरे होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेत रुग्णालये व कोरोना सेंटरमध्ये खाटा रिकाम्या राहिल्या आहेत. सेंटर तर सुरूच करण्याची वेळ या लाटेत आली नाही.

कोरोना परतीच्या वाटेवर 

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी जिल्ह्यात कोव्हिड केअर सेंटरमध्ये 744 हून अधिक बेडचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून जिल्ह्यात कोव्हिड सेंटरही सुरू करण्यात आली होती. मात्र, कोविड रुग्णांची घटती संख्या पाहून बहुतांशी कोरोना सेंटर बंद करण्यात आली आहेत. शहरात 8 व तिरोडा येथे 1 कोविड केअर सेंटर असून शहरातील शासकीय रुग्णालय येथे केवळ 3 रुग्ण उपचार घेत आहेत. 36 रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. आता तर कोरोना परतीच्या वाटेवर वेगाने वाटचाल करत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

Share