सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री…अण्णांचे उद्यापासून अमरण उपोषण
राळेगणसिद्धी: राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कडाडून टीका केली आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही मनमानी कशी करू शकता?, असा सवाल करतानाच वाईनही आपली संस्कृती नाही. सरकारच्या या निर्णयाविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्या १४ फेब्रुवारीपासून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
अन् अण्णा झाले भावूक
महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी किर्तनकार किर्तन करतात. पण सरकार किराणा दुकानात वाइन ठेवून ते क्षणात धुळीस मिळवत आहात. हे सर्व बघून आता जगण्याची इच्छा होत नाही. आयुष्याची ८४ वर्ष झालीत, तेवढी पुरेशी आहेत,” असं म्हणताना अण्णा हजारे यावेळी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, एक्साइज विभागाच्या राज्य सचिवांनी पुढचे निर्णय लोकांना विचारल्याशिवाय घेणार नाही, असं लिखीत स्वरुपात दिल्याचं अण्णा हजारेंनी सांगितलं. ‘उद्यापासून मी प्राणांतिक उपोषण करणार आहे’, असं अण्णा म्हणाले.