विनापरवानगीने झाडे कटाई प्रकरणी आरोपींना अटक
प्रहार टाईम्स वृत्तसंकलन
सडक अर्जुनी: सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालयातंर्गत कार्यालयाच्या पथकाने शेंडा/कोयलारी परिसरातील शेतातील झाडे विनापरवानगी झाडे कटाई प्रकरणी 27 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करुन झाडे शासनजमा केली होती. या प्रकरणातील आरोपींना शेंडा सहवनक्षेत्राच्या पथकाने 7 फेब्रुवारी रोजी अटक केली.
शेतातील झाडे शेतकर्यांकडून विकत घेऊन व वनविभागाची परवागनी घेऊन कटाई करता येते. मात्र तालुक्यात शेतातील झाडे विनापरवानगी कटाई करुन साठवणूक केल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यासंदर्भात शेंडा सहवनक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचार्यांनी शेतशिवारात गस्त वाढवून चौकशी सुरु केली. दरम्यान 27 जानेवारी रोजी शेंडा/कोयलारी जवळील शेतात विनापरवानगी झाडांची अवैध कटाई होत असल्याची माहिती वन कर्मचार्यांना मिळाली. माहितीच्या आधारे कर्मचार्यांनी धाड टाकली असता अवैधरित्या झाडे कटाई केल्याचे आढळले. याप्रकरणी शेतकर्यावर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964, कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करुन कटाई केलेली झाडे डोंगरगाव/डेपो लाकूड आगारात जमा केली होती. दरम्यान 7 फेब्रुवारी या प्रकरणात वनरक्षक नरेश पातोडे, दिलीप माहुरे यांनी आरोपी लेमन पंधरे रा. शेंडा, अक्षय बन्सोड रा. मसरामटोला, भरतराम मरस्कोल्हे, रा. कोयलारी, सुधाकर सयाम, रा. मसराम टोला व ईतर इसमांना अटक केली आहे. पुढील तपास फिरोज पठान क्षेत्रसहाय्यक हे करीत आहेत.
शेंडा परिसरात कुठेही अवैध वृक्षतोड झालेली नाही. एका खसरा प्रकरणातील ठेकेदाराने शेतकर्याच्या शेतातील माल तोडून गैरव्यवहार करण्याचा प्रकार केला होता. त्याला आळा घालण्यासाठी आमच्या कर्मचार्यांनी कारवाई करून कटाई केलेले सागवान झाडे डोंगरगाव/डेपो येथे जमा केले आहे, असल्याचे शेंडाचे क्षेत्र सहायक फिरोज पठाण यांनी सांगितले.
शेंडा बिटातील मालकी शेतामध्ये विनापरवानगीने सागवान झाडांची कटाई करण्यात आली होती, तशी महिती मिळताच सदर शेतकर्यावर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964, कलम 3 अन्वये वन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शेंडाचे बीटरक्षक नरेशकुमार पातोडे यांनी दिली.