TET घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई : OMR शीटची पडताळणी सुरू

पुणे : काही दिवसापूर्वी राज्यभरात आरोग्य भरती, पोलीस भरती आणि त्यानंतर टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरण चांगलेच गाजले आहे. पुण्यातील सायबर पोलिसांनी आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना, टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे समोर आले. या प्रकरणी तपास केल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून आता ओएमआर शीटची कसून तपासणी केली जात आहे.
अलीकडेच पुणे सायबर पोलिसांनी टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख यांच्यासह इतर काही दलालांना अटक केली आहे.

या कारवाई अंतर्गत आता पुणे पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.
टीईटी घोटाळ्यासंदर्भात पुणे सायबर पोलिसांकडून ओएमआर शीटची कसून तपासणी केली जात आहे. राज्य परीक्षा परिषदेतील 12 अधिकाऱ्यांच्या मदतीने ही तपासणी केली जात आहे. ओएमआर शीट तपासणीमधून या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणी अनेकांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आरोग्य भरतीच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी या घटनेचा तपास केला. दरम्यान टीईटी परीक्षा पेपर मध्येही गैरप्रकार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तेच धारेदोरे पकडून पोलिसांनी तपास केला असता, यामध्ये अनेक मोठे मोठे मासे गळाला लागले. यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांचा देखील समावेश होता. यावेळी पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची संपत्ती पोलिसांनी जप्त केली होती.

Share