विहिरीत पडून बिबट व तीन रानडुकरांचा मृत्यू

गोंदिया 22 : जिल्ह्यातील तिरोडा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या किडंगीपार शिवारातील एका शेतातील विहिरीत पडून बिबट व तीन रानडुकरांचा मृत्यू झाला. ही घटना 21 जानेवारी रोजी रात्री 730 वाजता उघडकीस आली. आज, 22 जानेवारी रोजी वन्यप्राण्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

किडंगीपार येथील शेतकरी हरीचंद दादूजी तुरकर यांच्या शेतातील विहिरीत 21 जानेवारी रोजी रात्री 7.30 वाजतादरम्यान बिबट व तीन रानडुकर विहीरीत पडल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच तिरोडाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.के.आकरे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता विहिरीत बिबटसह रानडुकर पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले.

आज 22 जानेवारी रोजी सकाळी उपवनसरंक्षक कुलराजसिंग यांना घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर विहिरीतून बिबट व रानडुकरांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, सावन बहेकार, बीटरक्षक एम. जे. सूर्यवंशी उपस्थित होते. पशुधन विकास अधिकारी डॉ. विवेक गजरे, डॉ. रेणुका शेंडे यांनी वन्यप्राण्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत बिबट्याला उपस्थितांसमोर जाळण्यात आले तर रानडुकरांना खोल खड्ड्यात पुरण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी एस. के. आकरे यांनी दिली.

Share