अरे वा… ओमिक्रॉनचे 99 टक्के रुग्ण केवळ सात दिवसांत बरे

नवी दिल्ली: ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या धास्तीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील 99 टक्के ओमिक्रॉनबाधित केवळ सात दिवसांत बरे झाले असून, त्यांच्यामध्ये कोरोनाची अतिशय सौम्य लक्षणे दिसून आली असल्याचा दावा दिल्ली येथील लोकनायक रुग्णालयामधील संशोधन अहवालातून करण्यात आला आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंट अत्यंत वेगाने पसरतो. मात्र, डेल्टाच्या तुलनेत शरीरातून लवकर निघून जातो. डेल्टाची लागण झालेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी 7 ते 10 दिवस लागतात. तर काही रुग्णांना महिनाभराचा देखील कालावधी लागतो. मात्र, ओमिक्रॉनच्या बाबतीत 92 टक्के रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी आठवड्यात नकारात्मक येत आहे.

ओमिक्रॉन विषाणूमुळे जीवितहानी कमी होत असल्याचे निष्कर्ष जगभरातील आकडेवारीतून समोर आले आहे. मागील पंधरा दिवसांतील रुग्णसंख्या वाढ आणि मृत्यू दर पाहता महाराष्ट्राचाही मृत्यू दर कमी असल्याचे दिसून येते. मृत्यूदर कमी होण्यात लसीकरणाचाही मोठा हातभार आहे. राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याने समूह प्रतिकारकशक्ती तयार झाल्याने बहुतांश रुग्ण लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणातूनच बरे होताना दिसत आहेत.

विविध इतिहासाचा आजार असलेले, वेगवेगळ्या कारणांनी कमी प्रतिकारकशक्ती असलेले आणि ज्येष्ठ नागरिक आदींनाच ओमिक्रॉनचा धोका राहील, असे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केले आहे.

Share