महाराष्ट्र हळहळला.. अनाथांची माय हरपली..! सिंधूताई सपकाळ यांचे पुण्यात निधन..!

पुणे : अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी पुण्यात सिंधूताई यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे अनाथांची माय हरपल्याची भावना अनेकांना व्यक्त केली.

सिंधुताई यांच्यावर काही दिवसांपूर्वीच पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर तब्बेत बिघडल्याने त्यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच, त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई यांना लोक प्रेमाने ‘माई’ म्हणत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सिंधूताईंचा जीवनप्रवास..
सिंधुताईचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा येथे झाला. घरच्यांना नको असताना, मुलगी झाल्याने त्यांचे नाव ‘चिंधी’ ठेवण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. शाळेत सिंधूताई हुशार असल्या, तरी त्यांना मराठी शाळेत जेमतेम चौथीपर्यंत शिकता आले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न लावण्यात आलं.. मात्र, त्यानंतरही त्यांचा संघर्ष सुरूच राहिला.

अखेर त्यांनी मोठ्या कष्टातून आपला मार्ग निवडला.. त्यासाठी आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी ‘सेवासदन’मध्ये दाखल केले नि सिंधूताई अनाथांच्या माय झाल्या. समाजातील अनाथ, बेवारस मुलांना आधार देण्याचे काम त्यांनी सुरु केले..

अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधूताई यांनी 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभार वळण येथे ‘ममता बाल सदन’ संस्थेची स्थापना केली. संस्थेत लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. तसेच त्यांना भोजन, कपडे व अन्य सुविधाही संस्थेकडून पुरवण्यात येत.

शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावीत, यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते. ही मुले आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर, त्यांना योग्य जोडीदार शोधून त्यांचे विवाह कार्यही संस्थेकडूनच केले जाते. या कामासाठी समाजातील अनेक दानशूर सढळ हाताने सिंधूताई यांना मदत करीत..

सिंधुताईंनी सुरु केलेल्या संस्था
– बाल निकेतन हडपसर, पुणे
– सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह,  चिखलदरा
– अभिमान बाल भवन, वर्धा
– गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
– ममता बाल सदन, सासवड
– सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे

सिंधुताईंना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार
– पद्मश्री पुरस्कार (2021)
– डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017)
– प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015)
– मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (2013)

– महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (2012)
– सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार’ (2012)
– पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (2012)
– महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (2010)

– दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’ (2008)
– पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’
– आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (1996)
– सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
– राजाई पुरस्कार
– शिवलीला महिला गौरव पुरस्कार
– ‘सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (1992)

जीवनावर चित्रपट प्रदर्शित
दरम्यान, सिंधुताई यांच्या जीवनावर आधारित ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपटही काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. सिंधुताईंच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.

Share