यू- ट्युबवरून शोधले नकली नोटा छपाईचे तंत्र, आरोपींना अटक
प्रतिनिधी / लाखांदूर : नकली चलनी नोटा छापण्यासाठी आरोपींनी यू-ट्युबवरून तंत्र आत्मसात केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. लाखांदूर येथे नकली नोटांचे प्रकरण बुधवारी उघडकीस आल्यानंतर चौघांना अटक करण्यात आली आहे.
प्रीतम गोंडाणे (२१, रा. मासळ), रोहित विनायक रामटेके (१९, रा लाखांदूर), मोहम्मद आसीम अब्दुल आसीफ शेख (२१, रा. वाडी, नागपूर) व सिनू उर्फ सुबोध मेश्राम (२१, रा. वाडी, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी ५०, १०० व ५०० रुपयांच्या नकली चलनी नोटा कलर स्कॅनर प्रिंटरवरून छापल्या होत्या. पोलिसांनी चौघांना अटक करून ५० रुपयांची, १०० रुपयाची एक नोट व एक १०० रुपयाची एका बाजुने छापलेली नोट तसेच ५०० रुपयांच्या दोन नोटासह कलर स्कॅनर प्रिंटर व अन्य १४ प्रकारचे साहित्य जप्त केले आहे.
आरोपींनी मोबाइल फोनमधून यू-ट्युबवरून नकली चलनी नोटा बनविण्याचे तंत्र शोधून स्कॅनर कलर प्रिंटरहून नकली नोटा तयार केल्यात. न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी दिली आहे.
घरमालकालाही दिली पाचशेची नकली नोट
– स्थानिक लाखांदुरात कलर स्कॅनर प्रिंटरवरून नकली नोटा छापण्यासाठीकलर स्कॅनर, प्रिंटर अर्जुनी तालुक्यातील धाबेटेकडी येथील एका घरी लपवुन ठेवले होते. घराचे घरभाडे अदा करतानी आरोपींनी चक्क घरमालकालाही ५०० रुपयांची नकली चलनी नोट दिल्याची माहिती पोलीस चौकशीत उघड झाली आहे.