LOGO

पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा: मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देश

गोंदिया, (दि. 30 नोव्हेंबर): राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी विशेष मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी पत्र क्र बीआयई-२०२०/प्र.क्र.६००/२०/३३ द्वारे दिले आहेत. त्यामुळे सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांना मतदान करण्यासाठी मतदानाच्या दिवशीची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने दि. २ नोव्हेंबर, २०२० च्या प्रसिद्धीपत्रकान्वये महाराट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद
विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग, या पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२०चा कार्यक्रम घोषित केला आहे. विद्यमान सदस्याचा कालावधी दिनांक १९ जुलै, २०२० रोजी समाप्त झाला आहे. सदर निवडणूकीचे मतदान दिनांक ०१ डिसेंबर, २०२० (मंगळवार) रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत व मतमोजणी दिनांक ०३ डिसेंबर, २०२० (गुरुवार) रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा देणे आवश्यक आहे. या संदर्भातील राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २३/०६/२०११ च्या शासन निर्णयानुसार सदर रजा मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच सदरचा शासन
निर्णय Ceo.Maharastra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. या निवडणूकीच्या मतदारांना मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमत्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

Share