शाळा सुरू:नागपूरात आजपासून इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू; तर औरंगाबादेत सोमवारपासून शाळेची घंटा वाजणार

नागपूर : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता हळूहळू राज्यातील महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्यास मनपाने परवानगी दिली आहे. नागपूरमध्ये आज तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेची घंट वाजणार आहे. पहिले ते सातवीपर्यंत वर्ग सुरू करण्यास मनपाने मान्यता मिळाल्यानंतर, आजपासून शहरात शाळा सुरू झाल्या आहेत.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून, सुरक्षित वातावरणात शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. आजपासून शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थांमध्ये देखील उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्यात देखील आजपासून शाळा सुरू

पुण्यात देखील गुरुवारपासून शाळा सुरू होणार आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. कोरोना नियमांचे पालन करत शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शाळेत किलबिलात पाहायला मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभुमीवर अनेक जिल्ह्यात शाळा सुरू करण्यास स्थानिक प्रशासनाने मंजुरी दिली नव्हती. त्यात, मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा काही दिवस बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Share