सुईविना कोरोनाची लस, ‘या’ जिल्ह्यात होणार शुभारंभ

नाशिक: ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढलेली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाचा लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता आरोग्य विभागाकडून नीडल फ्री अर्थात विनासुई लसीकरणाचा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. नीडल फ्री लसीकरणासाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.

लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाकडून नीडल फ्री लसीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमात ‘झायकोव-डी’ ही निडल फ्री लस दिली जाणार आहे. जळगाव आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना आठ लाख डोस मिळणार आहेत. झायकोव्ह डी लशीचे 28 दिवसांच्या अंतराने तीन डोस देणार आहेत. लसीकरणाला देशभरात वेगात सुरुवात झाली. यामध्ये पहिला डोस घेणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, त्या तुलनेत दुसरा डोस घेणार्‍यांची सं‘या कमी असल्याचे दिसून येत आहे. दुसर्‍या डोस घेण्याबाबतच्या निरुत्साह दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाकडून लसीकरणासाठी जनजागृती करून लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.

झायडस कॅडिला कंपनीची झायकोव्ह डी ही लस नीडल फ्री देण्यात येणार आहे. म्हणजेच सुईविना लस आता नागरिकांना दिली जाणार आहे. ज्या नागरिकांना सुईने लस घेण्यासाठी भीती वाटते अशा नागरिकांसाठी ही लस वरदान ठरणार आहे. पुढील काही दिवसांत या लसीचे वितरण नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस आणि त्यानंतर तिसरा डोस 56 दिवसांनी तिसरा डोस घ्यायचा आहे. नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे. त्यानंतर येथील प्रतिसाद पाहून राज्यातील इतर भागात नीडल फ्री लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

Share