परराज्यातून येणाऱ्यांना नवे नियम, शाळांबाबतही पुनर्विचार : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत असताना परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम लावण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत काही महत्त्वाची माहिती दिली आहे. देशातील आणि राज्यातील नियम एकसारखे असावेत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून केंद्र सरकारसोबत चर्चा करून निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
ओमिक्रॉनच्या वाढत्या भीतीमुळे परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंती अजित पवार यांनी दिली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियमावलीत तफावत होती. मात्र रात्री याबाबत सविस्तर अभ्यास करून ही तफावत दूर करण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. परदेशातून एखादा प्रवासी मुंबई विमानतळावर आला तर त्याचे नियमदेखील एकसारखेच असायला हवेत, असे पवार म्हणाले. याबाबत केंद्र सरकारशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यातील शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय जेव्हा घेतला, तेव्हा ओमिक्रॉन व्हायरसचा विषय नव्हता. निर्णय घेतल्यानंतर या व्हायरसचे अस्तित्व समोर आले. त्यामुळे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री याबाबत पुन्हा एक बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे शहरी भागात 15 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात सुरू झालेल्या शाळा अखंड सुरू राहणार का, अशी शंकादेखील उपस्थित होऊ लागली आहे.
सध्या मुंबई आणि शहरी भागात वेगळे नियम आणि ग्रामीण भागात वेगळे नियम आहेत. याबाबत सर्व राज्यात एकच धोरण ठरवण्याच्या दृष्टीने काही पावले उचलता येतील का, याचीदेखील चाचपणी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. याबाबतही केंद्र सरकारशी चर्चा करून निर्णय़ होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.