शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजीवर जोर, द्वैभाषिक धोरण लागू करण्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे निर्देश

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील होत असलेल्या बदलांशी जुळवून घेत मराठी भाषिक विद्यार्थी स्पर्धेत कुठेही मागे राहू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
संज्ञा आणि संकल्पना विद्यार्थ्यांना समजाव्यात म्हणून द्वैभाषिक धोरण लागू करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मराठीसोबतचं इंग्रजी भाषेतील संज्ञा, संकल्पना स्पष्टपणानं समजाव्यात. इंग्रजी भाषेतील शब्द, त्यांचा वापर यांसबंधी अधिक सुस्पष्टपणानं ओळख व्हावी यासाठी पहिली पासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.द्वैभाषिक भाषा धोरण सध्या राज्यातील 488 आदर्श शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे. या शाळेतील पहिलीच्या अभ्यासक्रमात द्वैभाषिक पुस्तकांचा समावेश करण्यात आला असून 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना द्वैभाषिक पाठ्यपुस्तक उपलब्ध करुन दिली जातील.
मराठी शब्दांच्या जोडीला विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोप्या इंग्रजीमधील शब्द आणि वाक्यांचा उपयोग समजावा अशा प्रकारे पाठ्यपुस्तकांची रचना करण्यात यावी, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळ पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या समंती नंतर राज्यात 1 डिसेंबरपासून पहिली पासून वर्ग सुरु होत आहेत. राज्य मंत्रिमंडळाने 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागात पहिली ते चौथी व शहरी भागात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळांत येणाऱ्या मुलांत प्रथमच शाळेची पायरी चढणारी मुले देखील असतील. मुलांचे आरोग्य व त्यांची सुरक्षा हेच आमच्यासाठी प्राधान्यक्रमाने कायम महत्त्वाचे राहिले असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Share