दिलासादायक! देशात 538 दिवसानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात काही महिन्यांपुर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र आता पाहायला मिळत आहे. मागच्या 24 तासात देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

मागच्या 24 तासात देशात 08 हजार 488 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात 12 हजार 510 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत. गेल्या 538 दिवसांनंतर पहिल्यांदाच नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या 24 तासात देशभरात 249 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत देशभरात 04 लाख 65 हजार 911 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 01 लाख 18 हजार 443 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा आकडा मागच्या काही महिन्यातील सर्वात कमी आकडा असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. भारतात तब्बल 116 कोटी 87 लाख 28 हजार 385 नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे.

Share