महामंडळाचा मोठा दणका : २३८ एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरु आहे. संप मागे घ्या, असे आवाहन करुनही कर्मचारी ऐकत नसल्याने एसटी महामंडळाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात 238 एसटी कर्मचा-यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांचे जागर गोंधळ आंदोलन सुरु आहे. मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच रोखले गेले आहे. दरम्यान, एसटीतील 238 कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित कर्मचार्‍यांवरही सेवा समाप्तीची कारवाई सुरू राहणार आहे. मात्र कर्मचारी आंदोलनावर ठाम आहे. .
राज्यातून आझाद मैदानातल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कर्मचारी दाखल होत आहेत.त्यांना अडवले जात आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या मनमाड आगारातील 21 एसटी कर्मचाऱ्यांना मनमाड पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मुंबईत आझाद मैदानात आंदोलनासाठी निघालेल्या मनमाडच्या 21 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र काही वेळ ताब्यात ठेवल्यावरनंतर समज देऊन या आंदोलकांना सोडून देण्यात आले. मनमाडहुन पंचवटी एक्स्प्रेसने हे आंदोलक मुंबईकडे निघाले होते. सकाळीच मनमाड रेल्वे स्थानकातच पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते.
आझाद मैदान इथे येत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पनवेल, कळंबोली, टोल नाके इथे पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेली ही माहिती दिली. आज अनेक ठिकाणाहून एसटी कर्मचारी आझाद मैदान इथे येत आहेत. गेल्या11 दिवसांपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत.
राज्य शासनाच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी भंडाऱ्यात मुंडन आंदोलन केले. कंत्राटीपद्धतीवरील अनेक एसटी कर्मचा-यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे या कारवाईला घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share