मागच्या २९ दिवसांत इंधन दर १० रुपयांनी वाढले पण निवडणुकांच्या तोंडावर भाजपशासित ‘या’ राज्यांनी व्हॅट केला कमी

नवी दिल्ली :

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यापाठोपाठ विविध राज्य सरकारांनी देखील नागरिकांना दिलासा देत व्हॅट करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. ज्या राज्यांनी व्हॅट कमी केला आहे, त्यात प्रामुख्याने भाजपशासित उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटक, आसाम, त्रिपुरा आदी राज्यांचा समावेश आहे.(Petrol Diesel rate)

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारले असून डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधन दरवाढ सुरू आहे. देशातील बहुतांश भागात पेट्रोलचे प्रतिलीटरचे दर ११० रुपयांच्या वर तर डिझेलचे दर शंभर रुपयांच्या वर गेले होते.

Petrol Diesel rate तरीही पेट्रोल १०० रुपयांना एक लिटरच मिळणार

इंधनाच्या दरवाढीमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधली अस्वस्थता वाढली होती. त्यामुळे दिवाळी सणातच नागरिकांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी रात्री घेत पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात लीटरमागे पाच रुपयांची तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात दहा रुपयांची कपात केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल किमान ५ रुपयांनी तर डिझेल किमान १० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार देशाची राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे प्रति लीटरचे दर आता १०३.९७ रुपयांपर्यंत खाली आले असून डिझेलचे दर ८६.६७ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मुंबईमध्ये हेच दर क्रमशः १०९.९८ रुपये आणि ९४.१४ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

मागच्या २९ दिवसांत ९.३५ रुपयांनी डिझेल महाग

अन्य महानगरांचा विचार केला तर प. बंगालमधील कोलकाता येथे पेट्रोल १०४.६७ रुपयांपर्यंत आणि डिझेल ८९.७९ रुपयांपर्यंत कमी झाले आहे. तामिळनाडूतील चेन्नई येथे हेच दर क्रमशः १०१.४० आणि ९१.४३ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सतत वाढ सुरु होती. मागील २६ दिवसांत पेट्रोल ८.१५ रुपयांनी महाग झाले होते. दुसरीकडे गेल्या २९ दिवसात डिझेल ९.३५ रुपयांनी महाग झाले होते. केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा दिल्यापाठोपाठ विविध राज्य सरकारांनी देखील लोकांना दिलासा देण्यासाठी व्हॅट करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यांमध्ये भाजपशासित राज्ये आघाडीवर आहेत.

भाजप शासित राज्यात व्हॅटवर कपात

पुढील वर्षीच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत असलेल्या उत्तर प्रदेशने पेट्रोल दरावरील व्हॅट करात लीटरमागे ७ रुपयांनी तर डिझेल दरातील व्हॅट करात दोन रुपयांची कपात केली आहे. यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी १२ रुपयांनी स्वस्त झाले आहे. व्हॅट कमी केलेल्या राज्यात बिहार, गोवा, आसाम, त्रिपुरा, सिक्कीम, कर्नाटक आदी राज्यांचा समावेश आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट प्रत्येकी सात रुपयांनी कमी केला जात असल्याची घोषणा केली आहे.

बिहार सरकारने व्हॅट दरात सर्वात कमी कपात केली आहे. बिहारने पेट्रोलवरील व्हॅट १.३० रुपयांनी तर डिझेलवरील व्हॅट १.९० रुपयांनी कमी केला आहे. आसाममध्ये पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट सात रुपयांनी कमी केला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनीही इंधनावरील व्हॅट सात रुपयांपर्यंत कमी केला जात असल्याचे सांगितले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीदेखील अशाच प्रकारची घोषणा केली आहे. ताज्या कपातीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल ६.०७ रुपयांनी तर डिझेल ११.७५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Share