Lakshmi Pujan Muhurat : लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या…

लक्ष्मीपूजनाची अमावस्या आज गुरुवारी, 4 नोव्हेंबरला आहे. यावर्षी लक्ष्मीपूजनाचा सर्वोत्तम लाभदायक मुहूर्त आहे, सायंकाळी 6.02 ते रात्री 8.34 पर्यंत! लक्ष्मीपूजन वैभवी-श्रीमंती थाटाने केले जाते. सुवर्ण मुद्रा, सोन्या-चांदीचे, हिरे-माणिक रत्नांचे दागिने- चौरंगावर सुशोभित, भरजरी भारी वस्त्राने वेष्ठित आसनावर तांदूळ, त्यावर पुष्प पसरून फुलांचे वा तांदळाचे कमळ काढून या कमला महालक्ष्मीचे थाटाचे पूजन उत्साहाने करावे. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत हा लक्ष्मीपूजनाचा जल्लोष बाजारपेठ दुमदुमून टाकतो.

श्री लक्ष्मीपूजन मुहूर्त (Lakshmi Pujan Muhurat)

सायंकाळी 6.02 ते रात्री 8.34
मध्यरात्री 12.25 ते 1.50

– पं. वसंत अ. गाडगीळ
शारदा ज्ञानपीठम

लक्ष्मीपूजन कसे करावे…

आश्विन आमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन दिवस. या दिवशी मंगलस्नानाने सुरुवात होते. सकाळी देवांची पूजा, दुपारी पार्वणश्राद्ध आणि संध्याकाळी लक्ष्मी, विष्णू तसेच कुबेर आदी देवतांची पूजा असा क्रम धर्मग्रंथांत सांगितलेला आढळतो. प्राचीन काळी बळी नावाच्या पराक्रमी राजाने पृथ्वी तर जिंकलीच शिवाय लक्ष्मीसारख्या अनेक देवतांना बंदिवासात टाकले. विष्णूने त्या सर्वांना मुक्त केले. मुक्त झालेले देव नंतर शांतपणे क्षीरसागरात जाऊन झोपी गेले, अशी कथा आढळते. या सर्व देवतांसाठी पूजेची व्यवस्था आणि सर्वत्र प्रसन्न पणत्यांचा उजेड केला जातो. पार्वणश्राद्ध म्हणजे श्राद्धाचा एक प्रकार असतो. पित्रादी त्रयीला उद्देशून व तीन पिंडांनी युक्त असे हे श्राद्ध केले जाते. प्राचीन ग्रंथांमध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे, याचे मार्गदर्शन आढळते. एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदलांचे कमल चिन्ह किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवतात.

Print Friendly, PDF & Email
Share