गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांना मंजुरीच!

गोंदिया 01: खरीप हंगामाला सुरुवात होऊन महिनाभराचा कालावधी लोटला असताना अद्यापही जिल्ह्यात शासकीय आधारभूत धान खरेदीला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यात जिल्हा पणन कार्यालय आणि आदिवासी विकास महामंडळाच्या उपअभिकर्ता संस्थांमार्फत धान खरेदी केली जाते. जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरीप हंगामासाठी आदिवासी आणि गैरआदिवासी क्षेत्रातील 151 धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. केवळ खरेदीची औपचारीकता म्हणून 30 रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रत्येक्षात मात्र धान खरेदीला सुरवातच झाली नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणने आहे.

dhaan_1  H x W:

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पन्न घेतले जाते. शेतकर्‍यांच्या उत्पादित धान शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत खरेदी केला जाता. हंगामाच्या सुरुवातीला धान खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित असते. परंतु तब्बल महिनाभराचा कालावधी उलटूनही जिल्ह्यात धान खरेदी सुरू झालेली नाही. गोंदिया जिल्ह्यात लागवड क्षेत्राच्या सुमारे 1 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. यावर्षी पीक साधारण असल्याचे शेतकरी सांगत आहेत. केंद्र शासनाने सन 2021-22 या हंगामासाठी साधारण धानाला 1940 रुपये तर उच्चश्रेणी धानाला 1960 रुपये हमी भाव जाहीर केला आहे.

मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने गोंदिया जिल्ह्यात 151 धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. यात आदिवासी विकास मंडळाअंतर्गत 44 व पणन विभागाचे 107 धान खरेदी केंद्रांचा आहे. माहितीनुसार काही मोक्याच केंद्रावर धान खरेदी सुरू आहे. 30 तारखेलला सर्व केंद्रावर खरेदीला सुरवात झाल्याचे सांगण्यात येत असले तरी खरेदीची आकडेवारीच उपलब्ध नाही. दिवाळी पर्वाला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत दोन आठवडापुर्वी धान खरेदीला सुरवात होऊन शेतकर्‍यांच्या हाती रक्कम पडणे अपेक्षित होते. नाईलाजास्तव शेतकर्‍यांना हमीभावापेक्षा 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल कमी दराने खासगी व्यापार्‍यांना धानाची विक्री करावी लागत आहे.

यासंदर्भात जिल्हा पणन अधिकारी कार्यालयात विचारणा केली असता, अनेक केंद्रांवर खरेदीचे नियोजन झालेले नाही, येत्या दोनचार दिवसात खरेदी केंद्रावरील आवश्यक सोयी सुविधा पूर्ण करुन सर्वच केंद्रांवर धान खरेदीला सुरुवात होणार असल्याचे सहाय्यक जिल्हा पणन अधिकारी बिसने यांनी सांगितले.

Share