पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण
गोंदिया – रुग्णांना वेळीच रुग्णालयात दाखल करण्यासाठी बरेचदा रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळण्यास अडचण होते. मात्र ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा आणि वेळीच उपचार मिळावा, यासाठी आपण कटिबध्द आहोत. आरोग्य सेवेपासून एकही रुग्ण वंचित राहू नये यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आपला सदैव प्रयत्न राहिल अशी ग्वाही पालकमंत्री नबाब मलिक यांनी दिली.
शासनाकडून गोंदिया जिल्ह्यासाठी २५ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या. या २५ रुग्णवाहिका जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राना उपलब्ध करुन दिल्या आहेत. यांचे लोकापर्ण शनिवारी (दि.३०) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. सहशराम कोरोटे, जिल्हाधिकारी नयना गुंडे व पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री मलिक म्हणाले, जिल्ह्याला प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण वाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. यामुळे आरोग्य सेवा बळकट करण्यास मदत होणार असून एकही रुग्ण वेळीच उपचार मिळण्यापासून वंचित राहणार नसल्याचे सांगितले. माजी. आ. राजेंद्र जैन यांनी खा. प्रफुल पटेल गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नरत असून आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले.
- या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश
शासनाकडून जिल्ह्यातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. यात बनगाव, कालीमाटी, चाना बाक्टी, गोठणगाव, केशोरी, कोरंबीटोला, धापेवाडा, फुटाणा, कोरंबीटोला, धापेवाडा, घानोडी, ककोडी, भानपूर, दवनीवाडा, कामठा, एकोडी, खमारी, मोरवाही, केसलवाडा, सोनी, तिल्ली मोहगाव, डव्वा, पांढरी, बिजेपार, दरेकसा, कावराबांध, सातगाव यांचा केंद्राचा समावेश आहे.