वनरक्षकच निघाला सागवन चोर : वनरक्षक निलंबित
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी वनपरिक्षेत्रामधील आलेवाही बिटाचे नियत वनरक्षक प्रशांत माणिकराव गायकवाड हे वनपरिक्षेत्रातील सागवान वृक्षाची तोंड करून वन नाक्यावर आणून फर्निचरचा व्यवसाय करीत असल्याचे समजताच दक्षता वनविभागाचे प्रभारी विभागीय अधिकारी सतीश चोपडे यांनी धाड टाकून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सागवान जप्त केले.
याप्रकरणी वनरक्षक गायकवाड याला अटक करून निलंबित करण्यात आले आहे. आलेवाही बिटाचे नियत वनरक्षक हे बऱ्याच महिन्यापासून घरात फर्निचर बनवीत असल्याचा सुगावा वन अधिकाऱ्यांना मिळाला होता. यासाठी लागणारे सागवान लाकूड जंगलातून तोडून घरी आणत होते. वाढईमार्फत हातकटाईव्दारा साईज बनवून फर्निचरचा व्यवसाय करीत होते. माहिती मिळताच दक्षता वनविभागाचे प्रभारी विभागीय वन अधिकारी सतीश चोपडे यांच्या नेतृत्वात व चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्या मार्गदर्शनात २१ ऑक्टोबरला आलेवाही वनरक्षकाच्या राहत्या नाक्यावर धाड टाकून सागवान ३१ नग सागवान (किंमत दोन लाख रुपये) जप्त करण्यात आले. गायकवाड याच्यावर वन गुन्हा दाखल करून त्याला निलंबित केले व अटक करण्यात आली आहे. हा व्यवसाय बऱ्याच महिन्यांपासून सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर वनविभागामध्ये खळबळ उडाली असून असे आणखी कुठे प्रकार सुरु आहे का, याचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.