रेल्वे प्रवाशांच्या पर्स, बॅग चोरी करणारी टोळी गजाआड
गोंदिया : रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या एक्स्प्रेसमधील रेल्वे प्रवाशांच्या लेडीज पर्स चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय (आसाम) टोळीस स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर पोलिसांनी जेरबंद केल्याची कारवाई काल २४ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. या प्रकरणात दोन आरोपीकडून १० लाखांचा माल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. नयनमुनी चंद्रकांता मेधी (२६), दीपज्योती चंद्रकांता मेधी (२२), संजू रामनारायण राय (२८), सर्व रा. डबोका, नोगाव आसाम असे आरोपींचे नाव आहे.
गोंदिया लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत हावडाकडून येणाऱ्या मेल एक्स्प्रेसमधील आरक्षित डब्यात रेल्वे प्रवाशांचे लेडीज पर्स, सोन्याचे दागिने व रोख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. रेल्वे पोलीस ठाणे गोंदिया येथे भादंविच्या कलम ३९२, ३४ गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार दीपक डोर्लीकर व पथक कार्यरत होते. तपासादरम्यान घडलेल्या गुन्ह्याचा सखोल अभ्यास करून रेल्वे प्रवासी गाड्यांचे रिझर्व्हेशन चार्ट, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुराव्याचे विश्लेषण करून आरोपी नोगाव (आसाम) येथील असल्याचे बाब पुढे आली. दम्यान सापळा रचून आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींनी रेल्वे प्रवासी गाडीच्या एसी कोचमध्ये रिझर्व्हेशन करून रेल्वे प्रवाशांच्या लेडीज पर्स चोरी केल्याचे कबुली दिली. सदर गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीजवळून ६ लाख ८६ हजार ४०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने वितळवून केलेली सोन्याची लगड वजन १४३ ग्रॅम किंमत १ लाख ४८ हजारांचे सोन्याचे दागिने, सोन्याची दुसरी लगड वजन ४११९० ग्रॅम किंमत १ लाख २० हजार ३८३ रुपये, आठ नग सोन्याचा बांगड्या वजन ३० ग्रॅम, रेल्वे पोलीस ठाणे गोंदिया येथील एका दुसऱ्या गुन्ह्यातील भादंविचे कलम ३७९, ३४ अंतर्गत १ लाख ५ हजार ६०० रुपयांचे दागिने वितळवून केलेली सोन्याची लगड वजन २२ ग्रॅम जप्त केली. या आरोपींकडून १० लाख ६० हजार ३८३ रुपये किमतीचा माल आरोपींकडून जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार दीपक डोर्लीकर, रवींद्र सावजी यांनी केली.