ऑस्कर्ससाठी भारतीय चित्रपटांची यादी निश्चित; ‘शेरनी’ व ‘सरदार उधम सिंह’चा समावेश
नवी दिल्ली – कलाक्षेत्रातील प्रत्येक अभिनेत्याचे जगातील प्रतिष्ठित अश्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. यंदाच्या 94 व्या ऑस्कर पुरस्काराची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. भारतीय सिनेसृष्टीतील सुद्धा काही चित्रपट या पुरस्कर सोहळ्यासाठी नामांकित होत असतात.
यंदाच्या वर्षी अभिनेत्री विद्या बालन स्टारर “शेरनी’ आणि विकी कौशल स्टारर “सरदार उधम सिंह’ या चित्रपटांची ऑस्कर 2022 साठी वर्णी लागली असून, दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2022 मधील ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनासाठी निवड प्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली. यात एकूण 14 भारतीय चित्रपटांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत.
‘शेरनी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित व्ही मसूरकर यांनी केले आहे. या चित्रपटात विद्या बालनने एका वन अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे जी मनुष्यभक्षक वाघाला पकडण्याचा प्रयत्न करते.
दुसरीकडे ‘सरदार उधम सिंह’ चित्रपटात विकी कौशल क्रांतिकारी सरदार उधम सिंहच्या भूमिकेत आहे. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला म्हणून एका ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळ्या झाडणाऱ्या एका क्रांतिकारकाची कथा आहे.