सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ!
मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतच्या किमतीतील सर्वोच्च उच्चांक गाठला आहे. त्यातच आता ऑक्टोबरच्या सुरूवातीपासूनच इंधनाचे दर चढतच असल्याचं पाहायला मिळत असल्याने सणासुदीच्या तोंडावर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत असल्याचं भयावह चित्र निर्माण झालं आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल,डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत.
आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 पैशाने वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या मुंबईत पेट्रोलचा दर 112.78 रुपये प्रतिलीटर आहे. तर डिझेलचा 103.63 रुपये प्रतिलीटर आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 106.98 रुपये प्रतिलीटर आहे. तर डिझेलचा दर 95.62 रुपये प्रतिलीटर आहे.
पेट्रोलच्या किमती जर अशाच वाढत राहिल्या तर आता लवकरच पेट्रोल 120 रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंधनाबरोबरच, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता भाज्यांचेही दर गडाडले आहेत. ऐन सणासुदीच्या काळातच एवढी महागाई वाढल्याने सामान्य नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रोज सकाळी 6 वाजता बदलत असतात. ऑक्टोबर महिन्यात 7 तारखेलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती महागल्या होत्या. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सतत होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांनी अक्षरश: डोक्याला हात लावला आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले आहेत.