विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच कोरोना लस देण्याचा निर्णय
पुणे: राज्यामध्ये कोरोना महामारीचा सगळ्यात जास्त फटका शिक्षण विभागाला बसला आहे. मागील दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद असतांना, महाविद्यालये सुरु करण्याच्या मागणीवरून कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशातच विध्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, पुणे महापालिकेकडून महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने संपूर्ण देशासह राज्यातही जोर धरला आहे. मात्र अजूनही अनेक विद्यार्थ्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. आता कॉलेज सुरू झाल्यामुळे लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच लस देण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.
११ ऑक्टोबरपासून पुण्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली होती. विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरातच लस देण्याच्या महापालिकेचा हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. महापालिकेच्या या विशेष मोहिमेला लवकरच सुरूवात होणार आहे. लसीकरण न झालेल्या 18 वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थीनींचे पुणे महापालिकेकडून महाविद्यालयात लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिका विशेष मोहिम राबवणार असल्याची माहिती देखील मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.