महिन्याचे बिल थकल्यास थेट वीज कनेक्शन होणार कट
मुंबई : सर्वसामान्यांना धक्का देणारी बातमी. ऐन सणासुदीत MSEB ने ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे. एक महिन्याचे वीजबिल थकल्यास MSEB वीज कापणार आहे. सध्या मुंबईतील भांडूप परिमंडळात कारवाई सुरु करण्यात आली आहे. ऐन गणपतीत कारवाईने नागरिक संतप्त झाले आहेत.
तुमचे एका महिन्याचे विद्युतबिल बाकी असेल तरी महावितरणाचे अधिकारी तुमच्या घरचे वीज कनेक्शन तोडणार आहेत. ऐन सणासुदीला महावितरण अधिकाऱ्यांनीच ही धक्कादायक बातमी दिली आहे. विशेष म्हणजे याबाबत अधिकाऱ्यांना कोणताही लेखी आदेश आलेला नाही. केवळ व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना केल्याचा खुलासा या अधिकाऱ्यांनी दिला. भांडूप परिसरात महावितरणाने ही कारवाई सुरु केली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, काहींनी पैसे भरुनही विद्युत जोडणी तोडण्यात येत असल्याने त्यांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. ऑनलाईन पैसे भरले तरीही विद्युत बिल भरले नाही, असे सांगण्यात येत आहे. याबाबत काही ग्राहकांनी संपर्क साधल्यानंतर सांगण्यात आले की, MSEBच्या सर्व्हरमध्ये समस्या होती. त्यामुळे ते बिल भरले की नाही, हे समजले नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही आमची समस्या नाही, असे ग्राहकांकडून सांगण्यात आले. त्यावेळी तुम्ही आधी जे काही पैसे आहेत, ते भरा. नंतर तुमचा विद्युत पुरवठा पूर्ववत होईल, असे MSEBकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या संतापात अधिक भर पडत आहे.