वेतनासाठी एसटी कर्मचारी पोहचले पोलिस ठाण्यात
विभाग प्रमुखाविरूध्द केली तक्रार ,भंडारा आगारातील प्रकार
भंडारा-एसटी कर्मचाऱ्यांनी चक्क पगार वेळेत मिळत नसल्याच्या कारणावरून राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभाग प्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार दिल्याची घटना भंडाऱ्यात उघडकीस आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी विभाग प्रमुखाविरोधात पगारासाठी पोलिसात तक्रार केल्याची कदाचित ही पहिलीच घटना असावी.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना 7 तारखेला वेतन देण्यात यावे, अशा सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या असताना देखील भंडारा एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा वेतन ऑगस्ट महिना संपत आला असताना देखील अद्यापही देण्यात आलेला नाही. शिवाय वेतन वेळेवर मिळत नसल्याची ही समस्या प्रत्येक महिन्यात असल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान भंडारा जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत भंडारा एसटी विभागप्रमुख विनय गव्हाळे यांच्याविरोधात भंडारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीवर एसटी कर्मचारी सुरेश दहेकर, सुरेश हलमारे, राजू बिसने, महेंद्र टेंभरे, प्रशांत ढोबळे, जितेंद्र दलाल, नितीन मते, किरण रामटेके, संतोषी राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पगारासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी विभाग प्रमुखाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची महाराष्ट्रातील ही पहीलीच घटना असावी. तर विभाग प्रमुखावर पोलिस गुन्हा दाखल करतात किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समस्या भंडारा विभागाची नाही – गव्हाळे
कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या ही केवळ भंडारा विभाग पुरती मर्यादित नाही. कोरोनानंतर आता एसटी विभाग पूर्व पदावर येत असून कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता प्रशासन पूर्ण प्रयत्न करीत आहे. याविषयी पोलिसात तक्रार करणे योग्य नसून कर्मचाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत विभाग नियंत्रक विनय गव्हाळे यांनी व्यक्त केले.