देवरी पोलीस रेड: 2 शिक्षक व 2 तलाठ्यांसह 6 जणांना जुगार खेळताना अटक
गोंदिया : समाजात शिक्षकांना आदर्श समजले जाते. तलाठ्यांनाही मानाचे स्थान आहे. परंतु काही शिक्षक आणि तलाठी शिक्षकी व्यवसायला कलंकित करण्याचे काम करतात. असेच एक प्रकरण पोलिसांनी केलेल्या कारवाईत समोर आले आहे. देवरी पोलिसांनी केलेल्या छापामार कारवाईत दोन शिक्षक, दोन तलाठी यांच्यासह सहा जणांना ताशपत्तीवर जुगार खेळताना अटक केले. त्यांच्याजवळून 59 हजार 447 रूपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी करण्यात आली.
अटक केलेल्या आरोपींमध्ये लोकनाथ तितराम, सुनील कांबळे, प्रकाश चव्हाण, सचिन तितरे, सुरेन्द्र काणेकर व गणेश कराडे सर्व रा. देवरी यांचा समावेश आहे. सदर कारवाई देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक घाडगे, पोलीस हवालदार कारंजेकर, गायधने, न्यायमूर्ती, मडावी यांनी केली.
याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, देवरी शहराच्या सुरभी चौक परिसरात 52 ताशपत्तीवर पैशाची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळला जात आहे. अशी माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी छापामार कारवाई केली. तेथे सदर आरोपी जुगार खेळताना आढळले. घटनास्थळावरून 59 हजार 447 रूपयांचा माल जप्त करण्यात आला. सर्व आरोपींविरुद्ध कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
उल्लेखनीय म्हणजे शिक्षकी पद समाजात आदर्श समजले जाते. तर तलाठी पदाचेही समाजात वेगळे महत्व आहे. तेच शिक्षक आणि तलाठी जर अशाप्रकारे वर्तणूक करीत असतील तर समाजात त्यांच्या पदाला कोणत्या दृष्टीने बघितले जाईल. सदर शिक्षक व तलाठी यांच्यावर त्यांच्या विभागाकडूनही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.