NDA परीक्षेत महिलांना संधी द्या’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
नवी दिल्ली – महिला सर्व क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने कार्य करतात. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कामगिरीने आजपर्यंत देशाची मान उंच केली आहे. शिक्षण, सामाजिक, आर्थिक, राजकारण, क्रिडा, तंत्रज्ञान, या क्षेत्रांना महिलांनी आपल्या कर्तृत्वाने नव्या उंचीवर नेलं आहे. सुरक्षा हे असं क्षेत्र आहे ज्यामध्ये महिलांना काही दलांमध्ये संधी होती पण त्यांच्या पंखाना सर्व स्तरावर उडण्यासाठी बळाची गरज होती.
सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश घेण्यासाठी परीक्षेला बसण्यास परवानगी दिली आहे. 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेला हा निकाल लागू असेल. सर्वोच्च न्यायालयानं महिलांना संधी देण्याला विरोध करणाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे. संबंधित घटकांनी त्यांची भूमिका बदलण्याबाबत सुनावलं आहे. तर, न्यायालयानं आदेश दिल्याशिवाय आपण काही करणार नाही का?, अशी विचारणा देखील केली आहे.
भुदल, नौदल, हवाईदल, या सुरक्षेच्या माध्यमातून महिलांना आपली क्षमता दाखवता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अद्याप महिलांना नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रवेश नव्हता. याकडे शेवटी सर्वोच्च न्यायालयाला लक्ष द्यावं लागलं आहे. आज न्यायालयाने एक ऐतिहासीक निकाल दिला आहे.
नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन नेवल अकॅडमीमध्ये महिलांना प्रवेश देण्यात यावा, यासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये अॅड. कुश कार्ला यांनी जनहित याचिका दाखल केली होती. आपण महीलांच्या समान न्याय व हक्कांची गोष्ट करतो मग त्यांना सर्व समान मिळायला हवं असही या याचिकेत म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाच सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.