राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; पुढील 3 दिवस महत्वाचे

मुंबई :जुलैच्या अखेरीस पावसाने राज्यात थैमान घातलं होतं. कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि ठाणे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली. मागील आठवड्यात पुन्हा मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता पुढील 2 ते 3 दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे.

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. तर काही नद्यांना पूर देखील आलाय. दुसरीकडे पुणे शहराला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे येत्या 3 दिवसात पुण्यात पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share