खासदारांना आवरण्यासाठी महिला कमांडोज आणता! ही कसली मर्दानगी? संजय राऊत संतापले

नवी दिल्ली : राज्यसभेत झालेल्या गोंधळावरून विरोधी पक्ष चांगलाच भडकलेला आहे. राज्यसभेत सुरू असलेला गोंधळ रोखण्यासाठी बुधवारी राज्यसभेत महिला कमांडोज बोलावण्यात आल्या होत्या. त्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राऊत म्हणाले, खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोजना बोलावता ही कसरी मर्दानगी? असा सवाल उपस्थित केला.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणालेत की, सभागृहात मार्शल बोलावणे ही काही नवी गोष्ट नाही. विधानसभेत आणि लोकसभेतही कमांडोज बोलावले जातात. पण जणू काही दंगल घडते आणि दंगल अटोक्यात येत नाही, तेव्हा सैन्याला बोलावले जाते तसे बंदुका घेऊन सैन्य बोलावले. भारत-पाकिस्तानच्या सीमेवरही असं सैन्य नसेल.

संसदेत खासदारांसमोर महिला कमांडोज होत्या. नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग अशा महिला कमांडोज घेऊन फिरतो. काल संसदेतही आम्ही पुढे जाऊ नये म्हणून हे कमांडोज आणले. महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी आहे, असा संताप राऊतांनी व्यक्त केला.

Print Friendly, PDF & Email
Share