अखेर राज्यात १७ ऑगस्टला शाळेची घंटा वाजणार, मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरातील आठवी ते बारवीचे वर्ग येत्या 17 ऑगस्टपासून सुरु केल्या जाणार आहेत. यासाठी 10 ऑगस्टला शिक्षण विभागाकडून जीआर जारी करून त्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक स्तरावर समित्या स्थापन केल्या जाणार असून त्यांच्या माध्यमातून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
शहरी भागात महापालिका आयुक्त आणि ग्रामीण भागातील शाळा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या जीआरमुळे विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी शिक्षण विभागाने झटकली असून आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येण्याची सुरुवात झाली असल्यामुळे राज्य सरकारकडून ब्रेक द चेन मधील सुधारित सुचनानुसार राज्यातील पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीच्या शाळा आणि शहरी भागातील आठवी ते बारावीच्या शाळा येत्या 17 ऑगस्ट पासून सुरु करण्याचा निर्णय यावेळी शिक्षण विभागाकडून घेण्यात आले आहे. मात्र याची सर्व जबाबदारी शिक्षण विभागने पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यावर टाकली आहे.
कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापुर,पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड,पालघर या भागातील शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करण्याचे सुचना यावेळी देण्यात आल्या आहेत. तर मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे या सारख्या शहरातील शाळा सुरु करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले असले तरी या शाळा कधी सुरू होतील, यावर स्पष्टता नसल्याने मुंबई – ठाण्यातील शाळांसंदर्भात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागासाठी तयार करण्यात आलेल्या समितिमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील तर मुख्याधिकारी नगरपरिषद, वैधीकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी सदस्य असणार आहे. तर शहरी भागासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितिमध्ये पालिका आयुक्त अध्यक्ष तर वार्ड ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी सदस्य असणार असल्याची माहिती जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शाळा सुरु करण्याची संपूर्ण जबाबदारी या समितीकडे असणार आहे.