राज्यपालांच्या गाडीच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा अपघात

हिंगोली 06: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हिंगोली दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांच्या गाडीच्या ताफ्याला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा अपघात झाला आहे.

या अपघातामध्ये तिन्ही गाड्यांचं किरकोळ नुकसान झाल्याचं समजतंय. अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याची माहिती मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यालयीन प्रमुखांची भेट घेत त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील पाण्याची सुविधा आणि सिंचन सुविधा याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. 

हिंगोली जिल्ह्यामध्ये 35 टक्क्यांपेक्षा कमी सिंचन क्षेत्र असल्याचं बैठकीतून राज्यपालांना समजलं. त्यासोबत जी काही प्रलंबित कामे आहेत त्याचा आढावा भगतसिंह कोश्यारींनी घेतला. ज्या ठिकाणी विकासकामे अर्धवट आहेत त्याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारला अहवाल सादर करणार असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. 

दरम्यान, राज्यपालांच्या दौऱ्यावरून आधीच राज्यातील राजकारण तापलेलं आहे. मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांवर दौऱ्यावरून निशाणा साधला होता. विरोधी पक्षातील भाजप नेत्यांनी राज्यपालांच्या दौऱ्याचं समर्थन केलं आहे.

Share