उमेद’ अभियानाच्या कार्यालय अधीक्षकाला 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

◾️उमेदचा कार्यालय अधीक्षक ACB च्या जाळ्यात

गोंदिया 4 : ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचविण्यासाठी व त्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देवून आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले. हे अभियान ‘उमेद’ या नावाने ओळखले जाते. पण या अभियानाला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. हे पुन्हा आज गोंदियात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे. जिल्हा परिषद गोंदिया येथील उमेदच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्षात कंत्राटी तत्वावर कार्यरत कार्यालय अधीक्षक आरोपी अमोल अन्नाजी भागवत याला 10 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई आज 4 ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांचे व अपंग व्यक्तींचे स्वयंसहायता समूह आहेत. या समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र (पलाश) गोंदिया शहरात स्थापित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ गोंदियाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक आणि तक्रारदाराचे वडील यांच्या करारनामा झाला होता. या करारनाम्यानुसार, तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे गोंदियाच्या रेलटोली येथील पाल चौकात असलेली इमारत 14 हजार 455 रुपये मासिक भाडे तत्वावर देण्याचा करार झाला होता. त्यानुसार नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत मासिक भाडे त्यांना प्राप्त झाले होते. त्यानंतर कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे इमारतीचे करार रद्द करण्यात आले होते.

तक्रारदार हे काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद गोंदियातील उमेदच्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षात कार्यरत कार्यालय अधीक्षक अमोल भागवत याला भेटले. तसेच मार्च 2021 ते जून 2021 या कालावधीतील इमारत भाडे काढून देण्याबाबत विचारपूस केली. त्यावेळी आरोपी अमोल भागवत याने उर्वरित 4 महिन्यांच्या भाड्याचे देयक काढून देण्यासाठी तक्रारदाराकडे 10 हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. पण तक्रारदाराला आरोपी भागवत यास लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे 2 ऑगस्ट 2021 रोजी तक्रार दाखल केली होती.

असा रचला सापळा…

सदर प्रकरणात 3 ऑगस्ट रोजी आरोपी भागवत याने केलेल्या लाच रकमेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आज 4 ऑगस्ट रोजी जिप गोंदिया येथील उमेदच्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षात लाचेचा सापळा रचण्यात आला. या यशस्वी सापळा कारवाईत उमेद अभियानाचा कार्यालय अधीक्षक आरोपी अमोल अन्नाजी भागवत (वय 40) याने तक्रारदारास मार्च 2021 ते जून 2021 या कालावधीतील उर्वरित 4 महिन्यांचे इमारत भाडे काढून देण्याकरिता 10 हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. तसेच ती लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः स्वीकारली.

यावरून आरोपी अमोल भागवत याच्याविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 7 लाचलुचपत प्रतिबंधक कडा 1988 (सुधारित अधिनियम 2018) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, सहायक फौजदार विजय खोब्रागडे, पोलीस हवालदार प्रदीप तुळसकर, राजेश शेंद्रे, नाईक पोलीस शिपाई योगेश उइके, रंजीत बिसेन, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, चालक पोलीस हवालदार देवानंद मारबते आदींनी केली.

Share