“फक्त 15 रूपयात नवा सातबारा, आता जमिनीच्या खोट्या नोंदीही करता येणार नाही”
पुणे: 1 ऑगस्टला सर्वत्र महसूल दिन साजरा केला जातो. या महसुल दिनाच्या निमित्तानं राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी जमिनीच्या खोट्या नोंदी आणि फसवाफसवीचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे अनेकांना सातबारा काढण्यास अडचणी येत होत्या. त्यातच आता तंत्रज्ञानाच्या मदतीने सातबारा काढण्याचं काम आता आणखी सोपं करण्याचा प्रयत्न शासनानं केला आहे. बाळासोहब थोरात यांनी नव्या ऑनलाईन फाॅरमॅटध्ये सातबारा मिळणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तलाठ्याचा वेळ वाचणार आहे आणि कुणालाही जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही, असं बाळासाहोब थोरात यांनी सांगितलं आहे. त्यासाठी बँकेसोबत करार करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांना फक्त 15 रूपये मोजावे लागणार आहेत, अशी माहिती देखील थोरातांनी दिली आहे.
1 ऑगस्टपासून सातबारा नव्या फाॅरमॅटमध्ये मिळणार आहे. त्याचबोरबर 4 ठिकाणी जर जमिनी असतील तर त्याचा एकत्रितरित्या एकच सातबारा मिळेल. ज्यांच्या सातबाऱ्यात 2008 पासून बदल झाले आहेत. त्यांचा सातबारा देखील नव्या डिजीटल स्वरूपात मिळणार आहे. तर स्टाॅम्प ड्युटीत देखील 6 महिने सवलत देण्यात आली आहे. दरम्यान, सातबारा आता ऑनलाईन पद्धतीनं काढणार असल्यानं त्यात कोणताही गैरप्रकार होणार नाही. त्याचबरोबर खोट्या नोंदी देखील होणार नाही. त्यात काही अडचणी आल्या तर आम्हाला सांगा आम्ही त्या अडचणी दूर करू, असं आश्वासन देखील बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे.