नागपुर संघ मुख्यालयाजवळ भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आपापसात
नागपूर – नागपुरमध्ये भाजप (BJP)-काँग्रेस (Congress) कार्यकर्ते आमने-सामने आले असून, त्यांच्यात वादावादी व धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरमधील संघ मुख्यालयाच्या परिसरात हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपापसात भिडले. नागपुरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी काढलेला मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले.
काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बंटी शेळके यांनी महागाई व अन्य केंद्र सरकारविरोधी मुद्यांवर एक रॅली काढली होती. संघ मुख्यालयाचा परिसर हा दाटीवाटीचा असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव याठिकाणी वाहतुकीवर बंदी आहे. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथूनच रॅली नेण्याचा हट्ट धरला. त्यावर तेथील भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे वाद निर्माण झाला आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर हा वाद मिटवण्यासाठी नागपूर पोलिसांना (Nagpur Police) मध्यस्थी करावी लागली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून घटनास्थळी पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली. यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळावरुन मागे जावे लागले, असेही सांगण्यात येत आहे.