जीवितहानी झाल्यावर येणार महावितरणला जाग…!
प्रा. डॉ. सुजित टेटे
देवरी 24: देवरी तालुक्यातील विविध विभागातील समस्यांना उधाण आले असून याचा फटका जनसामान्य नागरिकांना चांगलाच बसत असल्यामुळे तालुक्यातील जनतेने प्रशासनाकडे टाहो फोडला आहे. पिण्याच्या पाण्यापासून तर रस्त्यापर्यंत ग्रामीण भागातील लोकांच्या प्राथमिक समस्यांना समाधान कदाचितच मिळाला असेल ? अशीच एक जीवघेणी समस्या महावितरणच्या वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे समोर आली असून सामान्य जनतेचे जीव गेल्यावर संबंधित विभागाला जाग येणार का ? असा सवाल उपस्थित झालेला आहे.
नुकताच पावसाळा सुरु झाला असून ग्रामीण तसेच शहरी भागात झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सर्वांच्या परिचयाचे आहे. वाढलेल्या झाडांच्या फांद्या कापल्यासाठी महावितरण कोट्यवधींचा निधी खर्च करीत असते. परंतु ग्रामीण भागातील परिस्थिती काही वेगळीच असून याकडे महावितरण जाणून दुर्लक्ष करीत असल्याचे उदाहरण समोर आलेले आहे. तालुक्यातील डोंगरगाव परिसरात रस्त्या लगतच्या वीजवाहिनीच्या जिवंत तारांवर आणि उघड्या ट्रान्स्फार्मर वर वेली आणि झुडपे पोहचली असून पोल खाली पाणी वाहत आहे. ट्रान्स्फार्मर चे केबल जळाले असल्यामुळे वीजवाहिनी चा प्रवाह केव्हाही पाण्यात येऊन शेतात काम करणारे आणि रस्त्याने चालणाऱ्या लोकांचे जीव घेऊ असते आणि मोठी जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.
सदर प्रकाराची तक्रार महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे केली असून निष्क्रिय कर्मचाऱ्यामुळे परिसरातील समस्यांचे समाधान मिळाले नसून सदर ठिकाणावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागते यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
तक्रार करूनही महावितरणच्या बेजबाबदार कर्मचारी आणि अधिकारी याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप प्रशांत भांडारकर , सुरेश भांडारकर , माधव भांडारकर यांनी केले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.