लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार- राजेश टोपे
मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या हळू-हळू कमी होत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचं दिसून येतं आहे. परंतू तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात पुर्वीचेच निर्बंध कायम ठेवले आहेत. तर दुसरीकडे रूग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक वक्तव्य केलं आहे.
राज्यात आपण टप्याटप्यानं निर्बंध शिथिल करत आहोत. सुरूवातील विमानतळावरील प्रवाशांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याशिवाय त्यांना परवानगी नसायची. मात्र आता जर त्या प्रवाशाने दोन्ही डोस घेतले असतील, तर त्यांना आपण प्रवासाची परवानगी देत असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असणाऱ्या नागरिकांचे निर्बंध शिथिल करावेत. या विचाराबाबत कोणाचेही दुमत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फॉर्स मिळून घेतील, अशी मला आशा असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एक-दोन महिन्यात राज्याचं लसीकरण 100 टक्के करण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. परंतू त्यासाठी केंद्राने तेवढ्या लसींचा पुरवठा केला पाहिजे. जेणेकरून दररोज होणारं लसीकरणाचं प्रमाण वाढेल. राज्यात जरी 70-80 टक्के लसीकरण झाले तरी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल, आणि ती आताच्या परिस्थितीत गरजेची असल्याचंही राजेश टोेपेंनी सांगितलं.