जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तारीख ठरली : ११ ऑगस्टला सर्व राज्यात परीक्षा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीसाठी प्रवेश परीक्षा 11 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. “सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या सत्र 2021-22 च्या सहावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी नवोदय विद्यालय निवड चाचणी -2021 चं आयोजन 11 ऑगस्ट 2021 रोजी केलं जाईल. कोरोनासंबंधी सर्व खबरदारी आणि कोविड प्रोटोकॉलचं पालन करुन परीक्षा आयोजित केली जाईल.
देशभरातील नवोदय विद्यालयात 6 वीच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रवेश परीक्षा म्हणून जेएनव्हीएसटी प्रवेश परीक्षा घेतली जाते. जेएनव्ही वर्ग 6 प्रवेश परीक्षा प्रत्येक राज्यातील इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येते. प्रवेश परीक्षा दोन तासांच्या कालावधीसाठी घेतली जाते आणि त्यात तीन विभाग असतात. ज्यात एकूण 80 वस्तुनिष्ठ प्रश्न असतात आणि त्यात एकूण 100 गुण असतात. मानसिक क्षमता, अंकगणित चाचणी आणि भाषा चाचणी हे तीन विभाग आहेत.
जेएनव्हीएसटी इयत्ता 6 वीची परीक्षा दिल्यानंतर गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नवोदय विद्यालय समितीकडून कागदपत्रं पडताळणी करावी लागेल. केवळ कागदपत्रं पडताळणीनंतर,गुणवत्ता यादीतील उमेदवार जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवू शकतात.

Share