कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याकरिता प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केली रुग्णालयांची पाहणी

गोंदिया, दि.17 : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा पूर्ण क्षमतेने सामना करता यावा याकरिता आज शनिवार, 17 जुलै रोजी गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया, केटीएस रुग्णालय गोंदिया, जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड उपचार केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे भेट दिली.

आपल्या भेटीदरम्यान जिल्‍हाधिकारी नयना गुंडे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्यात. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला पूर्ण क्षमतेने करता यावा, याकरिता पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन साठवणुकीची व्यवस्था निर्माण करण्यात यावी, रुग्णालयातील बेडची क्षमता वाढविण्यात यावी, औषधसाठा पुरेशा प्रमाणामध्ये करून ठेवण्यात यावा तसेच कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांना अपाय होऊ शकतो, ही बाब विचारात घेता लहान बालकांना उपचार देता यावे याकरिता स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात यावा, अशा सूचना नयना गुंडे यांनी या वेळी उपस्थित असणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.

जिल्हा क्रीडा संकुल येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्यात.

जिल्हाधिकारी यांच्या या पाहणीप्रसंगी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नरेश तिरपुडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वतः कोविडचा सामना करण्याकरिता पाहणी करत असल्यामुळे अनेक समस्यांचे जागच्याजागी निराकरण होत असल्याचे या वेळी दिसून आले. जिल्हाधिकारी यांच्या या दौरा कार्यक्रमामुळे गोंदिया जिल्हा प्रशासन कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना सक्षमपणे करू शकेल, असा आत्मविश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केलेला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share