गोंदिया जिल्ह्याला राज्यात नवी ओळख मिळवून देऊ : खा.प्रफुल पटेल

पोलीस मुख्यालयात 46 नवीन वाहनांचे लोकार्पण

गोंदिया 18: गोंदिया जिल्हा राज्याच्या टोकावरील तसेच नक्षलदृष्टया संवेदनशील व भौगोलिक दृष्टीकोनातून लहान आहे. मात्र या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे आपले ध्येय आहे. या ध्येयपूर्तीसाठी पक्षपात व राजकीय व्देषभावनेचा अडसर न आणता सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आपले प्रयत्न सुरु आहे. भविष्यात या जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीकोनातून राज्यात नवी ओळख मिळवून देऊ, अशी ग्वाही खासदार प्रफुल पटेल यांनी दिली.

Vehicles received by Gondia Police Department

जिल्हा नियोजन व विकास निधीतून जिल्हा पोलीस प्रशासनाला 40 बोलेरो व 6 स्कार्पिओ असे 46 वाहने उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वाहनांचा लोकार्पण सोहळा पोलीस विभागातर्फे कारंजा येथील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी प्रामुख्याने आ.मनोहरराव चंद्रिकापुरे, आ.सहेषराम कोरोटे, आ.अभिजीत वंजारी, आ.विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी नयना गुंडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, माजी आ.खुशाल बोपचे, माजी आ.राजेंद्र जैन, विजय शिवनकर, डॉ.नामदेवराव किरसान, मुकेश शिवहरे, गंगाधर परशुरामकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, सुनील फुंडे, अमर वराडे, रमेश ताराम, सुनील लांजेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी खा.प्रफुल पटेल म्हणाले की, गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. आगामी काळात गोंदिया शहर समृध्दी एक्सप्रेसच्या माध्यमातून महानगरांशी जोडण्यात येणार आहे. या अनुषंगाने राज्याचे आघाडी सरकार आराखडा तयार करत आहे. त्याचप्रमाणे गोंदिया शहरातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांचे विस्तारीकरण तसेच नुतनीकरण करण्याच्या अनुषंगाने आराखडा आखला जात आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीकोनातून नवा आयाम प्राप्त होणार आहे.

गोंदिया पोलीस दलाला मिळालेले 46 वाहन निश्चितच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. पोलीस दल आणखी सक्षम व्हावे, या दृष्टीकोनातून विभागाकडून नवे प्रस्ताव लोकप्रतिनिधींनी समोर आणून दिले तर निश्चितच त्याबाबतचीही पूर्तता करण्याचे प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने करू, अशीही ग्वाही त्यांनी पोलीस विभागाला दिली.

याप्रसंगी कोरोना संसंर्गाच्या काळात पोलीस विभागाने केलेल्या कामगिरीचा उल्लेख करीत विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे खा.प्रफुल पटेल यांनी जनतेच्या वतीने आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व लोकप्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करून पोलीस विभागाला शुभेच्छा दिल्या.

Share