‘…अन्यथा जनता ठाकरे सरकारचा अंत केल्याशिवाय राहणार नाही’

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येतही हळू-हळू घट होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे राज्यात कोरोनाच्या मागोमाग डेल्टा प्लस व्हेरिएंटने आपलं डोकं वर काढायला सुरूवात केली होती. त्यामुळे सरकारने पुर्वीचेच निर्बंध अजुन कडक केले होते. मात्र गेल्या दोन आठवड्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला असता कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि मृताच्या आकडेवारीमध्ये घट होताना दिसत आहे.

त्यामुळे राज्यात पुन्हा पुर्वीसारख्या सगळ्या गोष्टी सुरू होणार, असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतू तरीही राज्य सरकारने राज्यातील निर्बंध अजूनही शिथिल केले नाहीत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारने लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये, नाहीतर ही जनता ह्या सरकारचा अंत केल्याशिवाय राहणार नसल्याचं म्हटलं आहे.

या संदर्भात मनसे नेते संदिप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. तरीही निर्बंध का उठवत नाही? ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. लसीकरण झाले तरी निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? असा सवालही संदिप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

तसेच, आम्ही लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यंना पत्र दिले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना त्यावर फक्त घरातच बसून राहायचंय, असं सांगितलं. त्यांच्या या निर्णयामुळे जनता सरकारवर नाराज आहे. हे वसुली सरकार फक्त हफ्तेखोरी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share