राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी; पुढील पाच दिवस ‘या’ भागांमध्ये पडणार संततधार

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन गतवर्षीपेक्षा लवकर झालं. परंतु त्यानंतर महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मान्सून दडी मारून बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच आता महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असताना दिसून येत आहे. वरुणराजाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने हजेरी लावून सुखावून टाकलं आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या व नाल्यांना पूर आला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने ओढे देखील तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसेच कोकणातील अनेक गावांमध्ये प्रशासनाकडून नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

दरम्यान, येत्या पाच दिवसात महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 10 जुलैनंतर महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार कालपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

दुबार पेरणी चा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता आलेल्या पावसाने दिलासा दिला आहे तसेच येत्या काही दिवसात ही महाराष्ट्रात सर्वदूर जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने यंदा शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असं बोललं जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share