“पटोलेंनी स्वबळाची घोषणा केल्यानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरे भरले आहे”- फडणवीस

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या बेधडक वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी नुकताच केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. पटोले यांनी केलेल्या या आरोपावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरे भरले आहे. त्यांना जेवण आणि पाणी देखील जात नाही. यामुळेच पटोलेंवर पाळत ठेवण्यात आली. नानांनी केलेल्या आरोपावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी  लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर आणखीही काही गंभीर आरोप केले आहेत. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

तसेच आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. आमच्या मित्र पक्षांचं काय प्लॅनिंग आहे, याबद्दल मला कल्पना नाही, असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Share