महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वाद? नितीन राऊत, बाळासाहेब थोरात अचानक दिल्ली दरबारी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काहीही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सध्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात सध्या वाद असल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात सुरू होत्या. त्यात आता नितीन राऊत आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अचानक दिल्ली दौरा केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.
नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात आज अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. ते काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर राहुल गांधी यांची खास भेट घेऊन पक्षांतर्गत असलेल्या वादावर देखील चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र काँग्रेसकडून या प्रकरणावर अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही.
दुसरीकडे काँग्रेसमध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून देखील वाद पेटल्याची चर्चा आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे विधानसभा अध्यक्षपद अजूनही रिक्त आहे. अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार आहे. परंतु, अध्यक्षपद कुणाला द्यायचं यावरून काँग्रेसमध्ये एकमत होताना दिसत नाही. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील अध्यक्षपद खाली होतं. या भेटीत विधानसभा अध्यक्षपदावर देखील चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सध्या काँग्रेसमध्ये दोन प्रमुख दावेदार आहेत. नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच या अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे नितिन राऊत यांच्याकडे राज्यातील मंत्रीपद असतानाही अध्यक्षपदासाठी दावेदारी आहेत. आता बाळासाहेब थोरात यांनी नितिन राऊतांसोबत दिल्ली गाठल्यानं नव्या चर्चांना उधाण आलं आहे.