नारायण राणे यांनी पहिल्याच दिवशी दाखविला हिसका..! अधिकाऱ्यांसोबतच्या पहिल्या मीटिंगमध्ये काय घडले वाचा..!

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील भाजपचे आक्रमक नेते नारायण राणे यांना संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे यांच्यावर लघू व मध्यम उद्योग मंत्रिपदाचा कार्यभार सोपविला आहे.

राणे यांनी अजिबात वेळ न दवडता आजच (गुरुवार) आपल्या मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घेताना, त्यांनी आपल्या कामाची झलक दाखवली.

कामाबाबत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपला दणका दाखवत राणे यांनी चांगलेच झापले. राणे यांचा रुद्रावतार पाहून दिल्लीतील सरकारी बाबू चांगलेच गर्भगळीत झाले होते.

नारायण राणे यांनी आज सकाळीच लघू व मध्यम उद्योग खात्याचा पदभार स्वीकारला. त्यानंतर ते लगेच कामाला लागले. तातडीने सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली; बैठकीबाबत पूर्ण अनभिज्ञ असणारे सरकारी अधिकारी कोणतीही तयारी करून आलेले नव्हते. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येत नसल्याचे पाहून राणे यांचा पारा चढला. आपल्या सर्व स्टाफला बाहेर काढून त्यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

मंत्रालयात मी पदभार स्वीकारण्यासाठी येणार असल्याचे माहीत असतानाही कोणतीही तयारी का केली नाही, असा सवाल करीत राणे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. बैठकीला येताना प्रत्येक अधिकाऱ्याने सोबत नोटबूक आणावी, असे सुनावले.

राणे यांनी जवळपास 1 तासाच्या बैठकीत 30 मिनिटे अधिकाऱ्यांचा क्लास घेतल्याचे समोर आलेय. राणेंच्या आक्रमक अंदाजामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.

ठाकरे यांचं मन एवढं मोठं नाही..
केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर शरद पवार यांनी फोन करुन चांगले काम करण्याचा सल्ला दिल्याचे राणे यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन न केल्याबद्दल खंत व्यक्त करताना मुख्यमंत्री ठाकरे यांचं मन एवढं मोठं नसल्याचा टोला राणे यांनी लगावला.

Share