थेट घरात घुसून केली राष्ट्राध्यक्षांची हत्या : जग हादरवणारी घटना

प्रतिनिधी / हैती : कॅरेबियन बेटांवरचा एक देश हैतीच्या राष्ट्राध्यक्षांची थेट त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. सारं जग हादरवणारी ही घटना आहे. ‘काही स्पॅनिश आणि इंग्लिश बोलणाऱ्या परकीय हल्लेखोरांनी राष्ट्रपती जोवेनल मॉइस यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला’, असं प्रभारी पंतप्रधान क्लाउड जोसेफ यांनी सांगितलं.
राष्ट्रपतींच्या निवासस्थानी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला असावा. या हल्ल्यात मॉइस यांची पत्नीसुद्धा जखमी झाली आहे. त्यांच्याही पोटात गोळी लागल्याच्या वृत्ताला पंतप्रधान जोसेफ यांनी दुजोरा दिला आहे.
या घटनेने सारा देश हादरला आहे. सोशल मीडियावर मॉइस यांना श्रद्धांजली वाहणारे संदेश सुरू झाले आहेत. “जनतेने संयम बाळगावा. लोकशाहीचाच अंतिम विजय होईल”, असं जोसेफ म्हणाले. प्रभारी पंतप्रधानपदावर गेले तीन महिन्यापासून असणारे जोसेफच आता देशाचे प्रमुख असतील.
अमेरिका खंडातला सर्वांत गरीब देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैतीमध्ये गेले काही दिवस राजकीय तणाव सुरू होता. जोवेनल मॉइस यांची टर्म संपल्यानंतरदेखील ते राष्ट्राध्यक्षपदावर होते. 2018 मध्ये खरं तर या देशात सार्वत्रिक निवडणुका होणं अपेक्षित होतं. पण राजकीय वादंग आणि अराजक सदृश वातावरणामुळे या निवडणुका लांबल्या. या देशात गरिबीबरोबरच गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा अभाव आहे. आता थेट राष्ट्रपतींच्याच घरात घुसून त्यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
निवडणुकांबरोबरच या देशाच्या घटनेतसुद्धा बदल करण्यास सुचवण्यात आलेलं आहे. हे बदल होण्यापूर्वीच राष्ट्रपतींची हत्या झाली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share