केंद्रीय शिक्षण मंत्र्यांपाठोपाठ आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचाही राजीनामा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आता विविध मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास सुरुवात केली आहे. यात दोन महत्वाच्या मंत्रालयाच्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यामुळे या दोन्ही मंत्रालयासाठी आता नवे चेहरे नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, डॉ. हर्षवर्धन यांना दुसरे खाते मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाच्या काळात देशाच्या आरोग्य मंत्रालयावर खूप मोठा ताण वाढला. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक आरोप आणि व्यवस्थापनाच्या त्रुटीवरून टीकांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सध्याच्या संकटात डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेऊन यांचे खाते नेमकी कोणाकडे सोपवली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपल्या खात्याचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, या नेत्यांना दुसरे कुठले खाते दिले जाणार काय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. डॉ. हर्षवर्धन यांना मात्र दुसरे खाते दिले जाणार असल्याची शक्यता आहे.

Print Friendly, PDF & Email
Share