ब्रेकिंग : शाळांची घंटा वाजणार..! कोरोनामुक्त गावात शाळा सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, मार्गदर्शक सूचना जाणून घेण्यासाठी वाचा..

राज्यातील कोरोनामुक्त गावातील 8 वी ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनामुक्त ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांना त्यासाठी ठराव करावा लागणार आहे.

राज्य सरकारने आज (ता. 5) शाळा सुरू करण्याबाबतचा शासननिर्णय जारी केला. त्यानुसार, ग्रामीण भागात कोविडमुक्त ग्रामपंचायतींनी 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यासाठी आधी पालकांशी चर्चा करुन मगच ठराव करावा लागेल. मुलांना एकाच वेळी शाळेत न बोलविता, टप्प्याटप्प्यात बोलवावे, असे शिक्षण विभागाने सांगितले आहे.

एका बाकावर एकच विद्यार्थी असेल. दोन बाकांच्या मध्ये 6 फूटाचं अंतर, तर एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असतील. त्यांना सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करावा लागेल.

कोणतीही लक्षणे दिसल्यास अशा विद्यार्थ्यास तातडाने घरी पाठविणे. त्याची कोरोना चाचणी करणे व कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.

शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना
– शिक्षकांच्या राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात असावी किंवा शिक्षकाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये. याबाबत दक्षता घ्यावी
– शाळा व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण असावे
– शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यावी.

–  थर्मामीटर, जंतूनाशक, साबण, पाणी आदींची उपलब्धता, तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी.
– शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास, ते इतर ठिकाणी हलवावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळांचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.

– क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.
– शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड-19 ची RTPCR / RAPID ANTIGEN चाचणी करावी.

– वर्गखोली, तसेच स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांनुसार करावी.
एका बाकावर एक विद्यार्थी, याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी.

Share