धक्कादायक……शिक्षकाची गळफास लावून आत्महत्या: जि. प.शाळा बोरकन्हार येथे होते कार्यरत
आमगाव(दि.5 जुलै): तालुक्यातील जि. प.शाळा बोरकन्हार येथे कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक सुनील मुटकुरे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
समाज मग तो कालचा असेल, आजचा असेल वा उद्याचा असेल या समाजाचा खरा शिल्पकार हा ‘शिक्षक’च होता आणि असेल हे गृहीतक समाजमान्य आहे. यातील भूतकाळ आणि काही अंशी वर्तमानकाळाबाबत शिक्षकवर्गाने आपल्या कृतीतून शिक्कामोर्तब केलेले आहे . याविषयी समाजाला सार्थ अभिमान आहे आणि समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या कृतीतून त्यावर वेळोवेळी शिक्कामोर्तब केलेले आहे. थोडक्यात काय तर शिक्षक वर्ग हा समाजासाठी दिशादर्शकाचे काम करणारा प्रमुख मार्गदर्शक आहे. पण हा दिशादर्शकच खचून जाऊन जिवाबद्दल टोकाची भूमिका घेत असेल तर ! अशीच घटना आमगाव येथे घडली. जि. प.शाळा बोरकन्हार येथे कार्यरत असलेले पदवीधर शिक्षक सुनील मुटकुरे यांनी आज पहाटे 5 च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
त्यांचा मृतदेह रिसामा येथील राधा-कृष्ण मंदिर परिसरात असलेल्या विहिरीत पाणी काढण्यासाठी असलेल्या गिरणी ला दोरखंडाने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही पण मुटकुरे हे एकाकी स्वभावाचे होते ते सहसा इतरात मिसळत नव्हते. मुटकुरे इंग्रजी विषयात निपुण होते,तसेच झाडांवर कलम करण्यात त्यांचा हातखंडा होता.
त्यांच्या अवकाळी जाण्याने शिक्षण क्षेत्राची अपरिमित हानी झाली, ती कधीही भरून निघणार नाही अश्या शब्दात गटशिक्षणाधिकारी एम.एल.मेश्राम यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा,मुलगी, पत्नी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आले असून पो.स्टे. आमगाव येथे मर्ग (क्र.१८/२१) दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.नाळे यांच्या मार्गदर्शनात स.फौ.कन्नमवार करीत आहेत.